नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती ईडीने आवळलेला पाश आता आणखी घट्ट होताना दिसत आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने (ED) आज अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी छापे टाकले. एवढेच नाही तर ईडीने अनिल देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेत देशमुख यांना आणखी एक धक्का दिला आहे. (Another blow of ED to Anil Deshmukh, another close person was taken into custody)
शुक्रवारी अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीची दोन पथके अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. . वडविहिरा हे देशमुख यांचे मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. दरम्यान, येथे छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतले. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर अनिल देशमुख यांचे समर्थक संतप्त झाले असून, सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. त्यामुळे देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.. या जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील १ कोटी ५४ लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील २५ प्लॉट्सचा समावेश आहे.
ईडीने जप्त केलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर आहे. २००४मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्याचे विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२०मध्ये करण्यात आले. देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते तसेच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात असल्याची माहितीही ईडीकडे असल्याचे समजते.