नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजपाने दिलेले आव्हान मोडीत काढून सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. (West Bengal Assembly Elections 2021 ) मात्र निवडणूक तोंडावर आली असतानाही तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. (Trinamool Congress ) आता आज अजून एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. (Another blow to Mamata Banerjee, Senior leader Dinesh Trivedi join the BJP)
गेल्या महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. तसेच तृणमूल काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये सुवेंदू अधिकारींसारख्या मातब्बर नेत्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी करत भाजपात दाखल झालेल्या आणि या निवडणुकीत नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.