लखनऊ : भाजपात आणखी एका नोकरशहाची एन्ट्री होणार आहे. गुजरात कॅडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी अरविंदकुमार शर्मा आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अरविंदकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकदम खास मानले जातात.
अरविंदकुमार यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर लगेचच ते विधानपरिषद निवडणुकीत सक्रीय झाल्याने राजकारणात एन्ट्री करणार असल्य़ाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. भाजपा त्यांना विधानपरिषदेवर पाठविणार असून आणखी कोणती मोठी जबाबदारी सोपविते याकडे लक्ष लागले आहे. यामुळे उत्तर प्रदेश सरकारपासून काही बड्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.
मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भाजपा नेहमीच जवळची वाटली आहे. मोदींचे कॅबिनेटपासून संसद ते उत्तर प्रदेश विधानसभेत व्हीआरएस घेऊन किंवा रिटायर झाल्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांचा दबदबा आहे. यामध्ये आता अरविंद शर्मा यांचे नाव आले आहे. मऊचे रहिवासी असलेले अरविंद हे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2001 ते 2013 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात होते.
मोदी पंतप्रधान बनताच अरविंद गे पीएमओमध्ये संयुक्त सचिव झाले. त्यांच्या नोकरीला दोन वर्षे शिल्लक होती. ते एमएसएमईच्या मंत्रालयात सचिव होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी अचानक व्हीआरएस घेतली. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषद सदस्य बनविल्यानंतर सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनविण्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता एक वर्ष उरले आहे. यामुळे युपीच्या जातीय समिकरणात अरविंद फिट बसत नाही, नाही त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे.