मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनीअर्णब गोस्वामींना अटक केली, त्यानंतर दुपारी अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. याबाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राम कदम यांनी सांगितले की, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी, पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही अशी मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.
दरम्यान याच प्रकरणात आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच लोकशाहीत पत्रकारिता चौथा स्तंभ आहे, पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी. गणवेशाचा वापर करून अर्णब गोस्वामींना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावं लागेल असं राम कदम यांनी सांगितले.
अर्णब गोस्वामींना कोर्टात हजर केल्यावर काय घडलं?
अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. तेव्हा न्यायधीशांनी अर्णबची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्णब गोस्वामी न्यायलयात हातवारे, इशारे करताना दिसल्यावर न्यायधीश संतापले, त्यांनी अर्णब गोस्वामी यांना तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका असं बजावलं, त्यानंतर अर्णब शांत बसून सुनावणी ऐकू लागले. अर्णबला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी नाकारला. त्यानंतर रिमांड अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने ३ निरीक्षणे नोंदवली.
पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली, कोणताही सबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे असा सवाल न्यायालयाने केला, तर अन्वय नाईक,आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध याबद्दल रायगड पोलीस न्यायालयाला समजून सांगू शकले नाहीत, पुरावेही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचं सांगत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. याबाबत बीबीसीनं वृत्त दिलं आहे. जवळपास ८-९ तास कोर्टात ही सुनावणी सुरु होती. न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.