मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं दाखवून व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना नाईक कुटुंबानं प्रत्युत्तर दिलं आहे. आपण काही तरी मोठी गोष्ट जनतेसमोर आणत असल्याचा किरीट सोमय्यांचा आविर्भाव आहे. मात्र त्या जमीन व्यवहारात लपवण्यासारखं काहीच नाही. आम्ही कोणाला जमीन विकू शकत नाही का? आम्ही कोणाला जमीन विकावी, हा आमचा प्रश्न आहे, असं अक्षता आणि आज्ञा नाईक म्हणाल्या.'आम्ही जमीन विकली. यामध्ये गैर काय? किरीट सोमय्या ७/१२ दाखवत आहेत. ७/१२ म्हणजे काही गोपनीय कागदपत्र नाही. तो सहज महाभूमीवर उपलब्ध होतो. त्यांना आणखी काही कागदपत्रं हवं असल्यास मी त्यांना सहकार्य करेन,' असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं. सोमय्या उगाच राजकारण करत आहेत. ते राजकारण करण्यासाठी काहीही करू शकतात, अशा शब्दांत अक्षता नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले किरीट सोमय्या?वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? मुख्यमंत्री याची माहिती राज्यातल्या जनतेला देणार का?, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.
नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंबं कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाईट असतं. लोकांना तसं वाटतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, असं आवाहन सोमय्या यांनी केलं. उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसं असेल तर त्यांनी जनतेला सांगावं, असंही सोमय्या पुढे म्हणाले.
वायकर आणि ठाकरे कुटुंबानं रायगडमध्ये जमीन खरेदी केली. त्यांनी आतापर्यंत असे किती व्यवहार केले आहेत? त्यांचे संयुक्तपणे किती व्यवसाय आहेत?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले. ठाकरे-वायकर यांनी नाईक कुटुंबाशी केलेला व्यवहार जुना असताना फडणवीस सरकार असताना त्याबद्दलच्या चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न पत्रकारांकडून सोमय्यांनी विचारण्यात आला. त्यावर स्थानिक लोक जमीन व्यवहारांची माहिती देत नाहीत. माझी सासुरवाडी रायगडमध्ये आहे. तिथे गेलो असताना व्यवहाराची माहिती मला मिळाली, असं उत्तर सोमय्यांनी दिलं.