मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर जिच्यापासून त्यांना दोन मुले झाले तिच्यासाेबतचे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी नियुक्त करण्यात आला आहे. या दोघांनी गुरुवारी आपल्या वकिलांमार्फत संमतिपत्र दाखल केले. अटी व शर्ती मंजूर करणे बाकी आहे.
संबंधित महिलेविरोधात धनंजय मुंडे यांनी डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. तसेच आपले फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट न करण्याचे निर्देश महिलेला द्यावेत, अशी विनंती केली.
हा दावा दाखल करण्यापूर्वी काही महिनेआधी संबंधित महिलेने मुंडे व तिचे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. मुंडे यांनी संबंधित महिलेकडून नुकसानभरपाईचीही मागणी केली. तसेच अंतरिम दिलासा म्हणून संबंधित महिलेला फोटो व व्हिडीओ पोस्ट न करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली. या दाव्यावरील सुनावणी न्या. ए. के मेनन यांच्या एक्सदस्यीय खंडपीठापुढे होती. गुरुवारी मुंडे यांचे वकील शार्दूल सिंग आणि महिलेचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीची नियुक्ती केली असून, दोघांनीही त्यासाठी संमती अटी घातल्या आहेत.
खर्च मुंडे करणारदोघेही मध्यस्थीकडे जाऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि मध्यस्थीचा खर्च मुंडे करणार आहेत. मुंडे यांनी मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर संबंधित महिलेच्या बहिणीने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. मुंडे यांच्यावर तिने बलात्काराचा आराेप केल्यानंतर समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली. तसेच यांसदर्भात मुंडे यांच्याविरुद्ध तिने पाेलीस ठाण्यात तक्रारदेखील नोंदवली हाेती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी दाखल करण्यात आलेली ही तक्रार तिने मागे घेतली.