मुंबई – राज्यातील लसीकरणावरून एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करत आहेत. अशातच काँग्रेस आमदारानेच शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का? असा सवाल केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत यांच्यातील वाद पुन्हा उभारून आला आहे.(Congress MLA Zeeshan Siddique Target Shivsena Minister Anil Parab over Covid Vaccination Centre inauguration)
काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना मंत्री अनिल परब यांना धारेवर धरलं आहे. झिशान सिद्धिकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. मी या मतदारसंघाचा स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे. तरीही प्रोटोकॉलनुसार मला या कार्यक्रमाला निमंत्रितही केले नाही. आता शिवसेना लसीकरणावरही राजकारणा खेळणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
झिशान सिद्धिकी यांच्या आरोपावरून भाजपा आणि मनसेनेही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा आमदार राम कदम म्हणाले की, आम्ही नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये भागीदारी असलेले काँग्रस पक्षाचे नेते सांगतायेत. ठाकरे सरकार लसीकरणावरही राजकारण करत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काँग्रेसला कसं लाचार बनवलं आहे हे राहुल गांधींनी बघावं. तुमचा पक्ष सर्वांसमोर अपमानित होत आहे. काय दिवस आलेत? असा टोला त्यांनी लगावला आहे.
तर मनसेचे अखिल चित्रे म्हणाले की, मी अशा मतदारसंघात आहे जिथे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत लढले मात्र नंतर महाविकास म्हणत एकत्र आले. मात्र एकत्र येऊन सुद्धा आता मतदारसंघात दोघे एकमेकांना काम करू देत नाहीत अशी रडारड सुरू आहे. या मतदारसंघाचे दुर्दैव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात जिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान येते. या मतदारसंघात मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यात मतांची विभागणी होऊन काँग्रेसचे झिशान सिद्धिकी निवडणुकीत जिंकले.