मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपानं महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अन्वय नाईकआत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक केली, त्यानंतर रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर केले, याठिकाणी कोर्टाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मात्र या प्रकरणात आता माजी खासदार निलेश राणे यांनी वेगळं वळण दिलं आहे. निलेश राणे म्हणाले की, इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांनी आईसह आत्महत्या केली असेल हे पटत नाही, तर त्यामागे पैशाचं कारण असू शकत नाही. ४-६ कोटींसाठी आईसह आत्महत्या का केली असावी? हा प्रश्न पडतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार अन्वय नाईक यांची संपत्ती ३०० कोटींपर्यंत होती, मी तेथील काही लोकांची चर्चा केली, त्यांनीही ही शंका उपस्थित केली. ३०० कोटींची मालमत्ता असलेला मालक आईसोबत का आत्महत्या करतो असा प्रश्न पडतो, चौकशीतून सत्य बाहेर येईल असं ते म्हणाले.
तसेच सुशांतच्या मृत्यूप्रकरणात ७० दिवसांत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या दबावाखाली पुरावे दडपण्याचा प्रयत्न केला असं मी म्हटलं होतं, मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचं काम पोलिसांचे आहे. दिशा सालियान-सुशांत प्रकरणात जे बोललो त्यावर आजही ठाम आहे, त्या ७० दिवसांत पुरावे नष्ट करण्याचं काम झाले ते समोर आणावं, सत्य जनतेसमोर येईल असंही निलेश राणेंनी सांगितले.
त्याचसोबत मराठी माणूस कोरोना आजारामुळे बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावा लागला? लॉकडाऊनमध्ये लाखो मराठी तरुण बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ % झाली, पण नेहमीप्रमाणे सोयीचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही असा टोलाही निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.
२०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद यांची आत्महत्या
कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक (Anvay Naik) आणि त्यांच्या आई कुमूद यांनी २०१८ मध्ये रायगडमध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले ५.४० कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटलं होतं.
नाईक कुटुंबीयांचा आरोप
'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.