करूर (तामिळनाडू) - व्हॉट्सअॅप चॅट लिक झाल्याने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी चांगलेच अडचणीत आले आहेत. बालाकोट हल्ल्यासारखी माहिती त्यांना आधीच मिळाली असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही गंभीर आरोप केला ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ती व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना मिळाली आहे. मात्र राहुल गांधी यांनी या संदर्भात कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाकडूनही या दाव्याबाबत काही उत्तर आलेले नाही.काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी आज करूर येथे रोड शो केला. तेव्हा तेम्हणाले की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसह केवळ पाच जणांनाच कुठल्याही सैनिकी कारवाईची माहिती असते. मात्र काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला बालाकोट एअर स्ट्राइकबाबत आधीच माहिती मिळाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाकडून बॉम्बवर्षाव करण्याच्या तीन दिवस आधीच एका पत्रकाराला काय होणार हे सांगितले गेले. असे करून आमच्या हवाई दलाच्या जवानांचे प्राण संकटात टाकले गेले, असा आरोप राहुल गांधींनी केला.राहुल गांधी म्हणाले की, बालाकोट एअर स्ट्राइकबाबत केवळ पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि हवाई दल प्रमुख यांना माहिती होती. या लोकांशिवाय अन्य कुणालाही एअर स्ट्राइकच्या आधी याची माहिती नव्हती. आता बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी ही माहिती एका पत्रकाराला कुणी दिली. माहिती असलेल्यांपैकीच कुणीतरी हवाईदलासोबत विश्वासघात केला असावा, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.