हैदराबाद : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा" असं म्हणत ओवैसींनी भाजपावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला होता.
"भाजपाने निवडणुका जिंकल्यानंतर हैदराबादच्या लोकांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा वचन दिलं आहे. भाजपा आपलं हे शौर्य लडाखमध्ये का दाखवत नाही, जिथे चीनने भारतीय जमिनीवर कब्जा केला आहे" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच असदुद्दीन ओवैसी यांनी आपला एक व्हिडिओही ट्विट केला आहे. "लडाखमध्ये चीनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर कित्येक महिन्यांपासून ठाण मांडलं आहे. येथे सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावं, पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचं नावदेखील घेत नाहीत" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"चीनवर सर्जिकल स्टाईक केलं तर आम्ही देखील कौतुक करू. चीनी सैनिकांना तिथून उखडून फेका. पण तेथं जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणार नाहीत. मात्र तुमचे नेते एका जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत करतील, तुम्ही काय सर्जिकल स्ट्राईक करणार, तुम्ही या शहरासाठी केलंच काय आहे?" असं देखील असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच याआधी असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा सणसणीत टोला ओवैसींनी लगावला आहे.
"30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद, एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?"
सोमवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळी काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? 30 ते 40 हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी" असं आव्हान ओवैसी यांनी दिलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी "द्वेष निर्माण करणं हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात" असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.