नवी दिल्ली - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर सभेत पाकिस्तान आणि ओवैसीचं नाव घेतलं जात आहे. बिहारमध्ये आता भाजपला ओवैसी दिसत आहेत असं ओवैसींनी म्हटलं आहे. "नितीश कुमार यांच्याविरोधात भाजपा कट रचत आहे. त्यांना निवृत्त करून भाजपा आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे" असं देखील ओवैसी यांनी म्हटलं आहे.
कैमूरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. "बिहारमधील जनता महायुतीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात भरडली गेली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीत अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. ते गरीबीत ढकलले गेले आहेत. उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्री बनवा. तरच बिहारच्या जनतेला न्याय मिळेल" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
"बिहारमधील जनता महायुतीच्या 15 वर्षांत भरडली गेली, अनेक तरुण बेरोजगार झाले"
"नितीश सरकारच्या काळात कैमूरमधील 70 टक्के धान गिरण्या बंद झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारमध्ये आले तेव्हा त्यांनी आपलं नाव घेतलं. पण बिहारमध्ये ओवैसी कसे दिसले? बिहारमध्ये आल्यावर मुख्यमंत्री योगींनी बिहारबद्दल बोलायचं होतं. पण ते पाकिस्तान आणि माझ्याबद्दल बोलत होते" असं ओवैसी म्हणाले. तसेच ओवैसींनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. "मी आपल्या समोर नतमस्तक आहे. बिहारच्या त्या वीर जवानांनी गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत देशासाठी बलिदान दिलं, असं मोदी म्हणाले."
ओवैसींनी पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा
"शूर जवानांना आणि त्यांच्या आई-वडिलांना सॅल्यूट करतो. पण ज्या मातांनी आपली मुलं गमावली त्यांच्या मुलांच्या बलिदानाचा बदला मोदींनी चीनकडून घेतला की नाही? पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावं" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये एका वर्षाच्या आता 19 लाख रोजगार देण्याचं आश्वासन भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलं आहे. तर आरजेडीने 10 लाख रोजगार देऊ, असं म्हटलं आहे. या दोघांनी बिहारवर 15 - 15 वर्षे राज्य केलं, किती नोकर्या दिल्या? असा प्रश्न ओवैसींनी विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2020) प्रचारात भाजपा उमेदवारांच्या सभांना फारशी गर्दी होत नाहीय. तर दुसरीकडे लालूंच्या पक्षाच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाषणादरम्यान संयम सुटला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. बेगुसरायमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शनिवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीश यांनी असं म्हटलं आहे. "इतरांना सरकार बनविण्याची संधी मिळाली. त्यांनी काय केले? एखादे शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं म्हटलं आहे.