हैदराबाद: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा आहे. मोदींना भारताचा इतिहास जमावाकडून झालेल्या हत्यांसाठी लक्षात ठेवेल, अशा शब्दांमध्ये ओवेसींनी मोदींवर टीका केली. मोदींच्या कार्यकाळात देशात जमावाकडून सर्वाधिक हत्या झाल्याचं ओवेसी म्हणाले.गोमांस विक्री, गोमांस वाहतूक यावरुन तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हत्यांवरुन ओवेसींनी मोदींवर शरसंधान साधलं. 'या घटना मोदींना कायम घाबरवतील. कारण पंतप्रधान असूनही त्यांना या घटना रोखता आल्या नाहीत,' असं ओवेसी म्हणाले. आसाममध्ये रविवारी (7 एप्रिल) एका मुस्लिम व्यक्तीला जमावानं मारहाण करण्यात करुन त्याला जबरदस्तीनं गोमांस खाण्यास भाग पाडण्यात आलं. ओवेसींनी या घटनेचा निषेध केला. 'ज्या राज्यात गोमांसावर बंदी नाही, जिथले लोक गोमांस खातात, तिथे शौकत अली नावाच्या एका 68 वर्षीय बेदम मारहाण केली जाते. त्याला जबरदस्तीनं गोमांस खायला लावलं जातं. यापेक्षा वाईट काय असू शकतं?', असं ओवेसी म्हणाले. आसाममधील या घटनेचा संदर्भ देत ओवेसींनी भाजपाला लक्ष्य केलं. 'आपलंच सरकार सत्तेत आहे. त्यामुळे आपल्याला वाचवलं जाईल, ही गोष्ट शौकत अली यांना मारहाण करणाऱ्यांना माहीत होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अशा प्रकारच्या वृत्तींना प्रोत्साहन मिळालं,' अशा शब्दांत त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. कमकुवत, वंचित लोकांसाठी लढणाऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 'मोदी सर्वांसाठी बोलत नाही. ते केवळ संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे चौकीदार आहेत. स्वत:ला देशापेक्षा मोठं न मानणाऱ्या व्यक्तीला मत द्या,' असं ओवेसी म्हणाले.
जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा- ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 10:15 PM