मुंबई: 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका व्यक्तीनं कानशिलात लगावली होती. पण, तेव्हा पवारांनी संयम पाळत त्या व्यक्तिला माफ केलं होतं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही', असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलारांनी आज पत्रकार परिषद घेऊन काल राज्यात घटलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी शेलारांनी थेट शरद पवारांसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. 'काही वर्षांपूर्वी शरद पवारांना कानशिलात लावलेली देशानं पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही', असं शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतंशेलार पुढे म्हणाले की, 'नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हाही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं. त्यानंतर सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, त्यावेळीही ठाकरेंनी तेच केलं. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळालेलं उद्धव ठाकरेंना देखवत नाही, त्यांच्या पोटात दुखत आहे', अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच, 'आमच्या माहितीनुसार अटकपूर्व जामीन अर्ज 4 ते साडे चारच्या दरम्यान निकाली निघाला त्याआधीच मंत्री अनिल परब सांगतायत की जामीन नाकारण्यात येणार आहे. याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केल्याची दाट शंका आहे, असा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अणि देशाची माफी मागावी'शिवसेनेला नारायण राणे यांच्या वक्तव्यावर राग नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्यदिनाचं अज्ञान उघड झालं त्याचा थयथयाट आहे. 15 ऑगस्टरोजी महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री हा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव याबाबत अज्ञान जाहीर करतायेत. की जाणुनबुजून केले जातेय की अजाणतेपणे झालंय? 15 ऑगस्ट हा देशवासियांच्या अभिमानाचा दिवस असताना मुख्यमंत्री मुख्य सचिवांना विचारतायेत. हे लपवण्याचा त्यांचा थयथयाट आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागावी', अस शेलार म्हणाले.