मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोर्चात भाजपाही सामिल झाला आहे. त्यावरून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजपा मोर्चे काढत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे ते बघू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. (ashok chavan slams bjp for its stand for maratha reservation)
यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. "मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजपा मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?", असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपाला एकप्रकारे इशारा दिला आहे.
("मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका)
कोल्हापुरातील आंदोलनात चंद्रकांत पाटीलही सहभागी दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्याचे दोन दिवसाचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी करत कोल्हापूरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या किती लावून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या आंदोलनात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. तसेच, मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, यासाठी जे-जे लोक आंदोलन करतील. त्या आंदोलनात भाजपाचा झेंडा न घेता आणि भाजपाचा कार्यकर्ता असल्याची ओळख न दाखवता आम्ही सहभागी होणार आहोत, असे आम्ही म्हटले होते. त्यानुसार आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
झोपेत शपथ... मी...ईश्वर साक्षीने शपथ घेतो की...'देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाच्या शर्यतीत आणखी एका म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नाची भर पडली असल्याचे व्यंगचित्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपा नेत्यांच्या 'स्वप्नांना' उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. जनता झोपेत असताना सकाळी सरकार बदललेले असेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तोच धागा पकडत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून 'झोपेत शपथ... मी... ईश्वर साक्षीने शपथ घेतो की' ... असे टायटल देत चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न तर पडत नाही ना हे दाखवत भाजपावर निशाणा साधला आहे.