नवी दिल्ली - आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assam Assembly Elections 2021) पार पडणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) या काही दिवसांपूर्वी आसाममध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांच्या कामाचं स्वरूपही जाणून घेतलं. प्रियंका गांधी यांनी चहाच्या पानं खुडत मजुरांशी गप्पाही मारल्या. त्या पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होत्या. यावरूनच भाजपाने आता काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
राजनाथ सिंह यांनी आसामच्या लुमडिंगमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चायवाला' म्हणून अनेकदा त्यांची चेष्टा करण्यात आली आहे. त्यावरून राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "आधी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यांनी "चायवाला" असं म्हणत खिल्ली उडवली होती, तीच लोकं आज चहापत्ती खुडत आहेत आणि विकत आहेत. खऱ्या चायवाल्याने त्यांना चहाच्या मळ्यांपर्यंत आणून सोडलं आहे. पण खबरदार, खरा आणि प्रामाणिक चायवाला आमच्यासोबत आहे" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
प्रियंका यांनी आसाममधील सदरू टी एस्टेटमध्ये महिला मजुरांशी संवाद साधला होता. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंदर्भातील काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर ते जोरदार व्हायरल झाले होते. यावरून आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल या तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल जाहीर केले जातील. सध्या आसाममध्ये एनडीएचं सरकार असून सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत.
"नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेय"; राहुल गांधीचा RSS ला सणसणीत टोला
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी "देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.