पटना – बिहारमधून इतर राज्यात स्थलांतरण केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, कामानिमित्त बिहारमधून लोक बाहेरच्या राज्यात जातात आणि त्याठिकाणी आपली संख्या वाढवतात. त्यामुळे अनेक राज्यात बिहारी लोकांच्या लोकसंख्येवर तेथील स्थानिक राजकारण अवलंबून असतं. सध्या आसाम विधानसभा निवडणुकीत बिहारी लोकांचं वर्चस्व समोर येत आहे.
आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं, याठिकाणी बिहारी लोकांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरते, तिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होता, यंदाही २०२१ च्या निवडणुकीत तिनसुकिया मतदारसंघात बिहारी मतदान निर्णायक भूमिकेत आहे.
आसाममधील तिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. हिरादेवी मूळच्या बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. १९८४ मध्ये लग्नानंतर हिरादेवी आसाममध्ये आल्या. तिनसुकिया जिल्ह्यातील त्या मोठ्या उद्योजिका आहेत. सध्या हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. याठिकाणी विद्यमान आमदार संजोय किशन हेदेखील मैदानात उतरले आहेत. मागील वेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार आणि सलग ३ वेळा आमदार राहिलेले राजेंद्र प्रसाद सिंह यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजेंद्र सिंह भाजपात सहभागी झाले होते, त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसने राजदसाठी सोडला आहे.
१५०० कुटुंब अधिक हिंदी भाषिकांची संख्या
तिनसुकिया जिल्ह्यात जवळपास १५०० कुटुंब असे आहेत, जे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेत, जिल्ह्यातील ११०० गावांपैकी ३०० गावात हिंदी भाषिक आहेत, अनेक जण आसाममध्ये तीन-चार पिढ्यापासून राहत आहेत. आसाममध्ये अनेकदा बिहारी लोकांमुळे स्थानिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत तेथे हिंसक आंदोलन घडले आहेत. तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे. येथे पहिल्यांदा राधाकृष्ण खेमका निवडून आले होते, ते २ वेळा आमदार होते, १९८५, १९९१ मध्ये येथून काँग्रेसचे शिव शंभू ओझा विजयी झाले, ते आसामच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय होते.