नवी दिल्ली - आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Assam Assembly Elections 2021) सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राजकारण तापलं आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला सणसणीत टोला लगावला आहे.
राहुल गांधी "देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 27 मार्च रोजी आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेला पाच आश्वासनं दिली आहेत. "भाजपाने आसामच्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना 351 रुपये रोज देण्याचं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात 167 रुपयेच दिले जातात. पण मी नरेंद्र मोदी नाही, मी फसवणार नाही. आज मी तुम्हाला 5 गोष्टींची खात्री देतो. चहाच्या मळ्यातल्या मजुरांसाठी 365 रुपयांचा दर, सीएएला विरोध, राज्यात 5 लाख रोजगाराच्या संधी, 200 युनिटपर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक गृहिणीसाठी 2000 रुपये" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप
दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. म्हणींचा वापर करत मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी आयकर विभाग (Income Tax Department), सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) याबाबत ‘उंगलियों पर नचाना’ या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार यांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधी यांनी माध्यमांबाबतही एक म्हण लिहिली आहे. माध्यमं ही पंतप्रधान मोदी यांचे मित्र असल्याचं म्हटलं. तसेच 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे' या म्हणीचा वापर करुन सरकार शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकत असल्याचं राहुल गांधी यांनी याआधी म्हटलं होतं.
राहुल गांधी यांनी सिलिंडरच्या वाढत्या दरावरून निशाणा साधला होता. "एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा" असं ट्विट करत राहुल गांधी केलं असून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली होतीय यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी गॅसचे दर 25 रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी 50 रूपयांची वाढ करण्यात आली होती.