नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी आयाेजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लुधियाणा येथील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांची पगडीही काढून फेकण्यात आली. त्यांच्या वाहनाचीही ताेडफाेड करण्यात आली आहे.
सिंघू सीमेवर विविध संस्थांनी शेतकऱ्यांसंदर्भात आयाेजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात रवनीतसिंग उपस्थित हाेते. त्यांच्यासाेबत अमृतसर येथील काँग्रेसचे खासदार गुरजितसिंग औजला आणि आमदार कुलबीरसिंग झिरा हेदेखील कार्यक्रमाला हजर हाेते. त्यांचीही पगडी फेकण्यात आली. एका समूहाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेबाबत रवनीतसिंग यांनी साेशल मीडियावरून माहिती दिली. हल्ल्याबाबतचे काही व्हिडिओदेखील व्हायरल झाले. रवनीतसिंग यांनी सांगितले, की हल्ला करणारे गुंड प्रवृत्तीचे लाेक आहेत. माझी हत्या करण्याचा हा कट हाेता. ते चार जण हाेते. त्यापैकी एकाने शर्टच्या आतून शस्त्र काढण्याचा प्रयत्न केला, असे रवनीतसिंग म्हणाले. हल्लेखाेरांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला समर्थन दिले हाेते. त्यांना परदेशातून फंडिंग झाल्याचा आराेपही त्यांनी केला.
जंतरमंतरवर आंदोलनकाँग्रेसचे तिन्ही नेते पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचे नातू आहेत. अशा प्रकारची घटना २६ जानेवारीला हाेऊ नये, यासाठी शेतकरी संघटनांनी काळजी घ्यायला हवी, असे रवनीतसिंग यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने दिल्लीत जंतरमंतर येथे स्वतंत्रपणे आंदाेलन सुरू केले असून, तिन्ही नेते त्यात सक्रियपणे सहभागी झाले आहेत.