मुंबई – आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील मैदानात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे माजी नेते सिराज मेहंदी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सिराज मेहंदी यांच्यासोबत अनेक नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येतील अशी आशा पवारांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.
शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जनतेला राज्यात बदल घडवायचा आहे. येणाऱ्या काळात हा बदल नक्कीच घडेल. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. समाजवादी पक्षासोबत अन्य लहान पक्षांशी आघाडी करत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेससोबत आघाडीसाठी बोलणी सुरु आहेत असंही त्यांनी सांगितले.
तसेच उत्तर प्रदेशातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशावर बोलताना शरद पवारांनी भाजपावर भाष्य केले. १३ आमदार लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा पवारांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचसोबत आगामी काळात मी स्वत: उत्तर प्रदेशात प्रचारासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार?
मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेलं सरकार बाजूला सारणं महत्त्वाचं आहे. देशात सर्वधर्म समभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल", असा एल्गार शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.