नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या सावटामध्ये 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी आज होत असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुपारपर्यंत विधानसभांचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आसाममध्ये तीन तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 8 टप्प्यांमध्ये मतदान झाले. याच दरम्यान काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी मोठं विधान केलं आहे.
"कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही" असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे" असं म्हटलं आहे. सिब्बल यांनी "आज निकालाचा दिवस आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे" असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.
मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोल्समध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ममता बॅनर्जी याच सरकार स्थापन करतील, अशी शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोल्समधून व्यक्त करण्यात आली आहे. आसाममध्ये भाजप आणि केरळमध्ये डावी आघाडी सत्ता कायम राखतील. तामिळनाडूत सत्तांतर होऊन डीएमके सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुदुच्चेरीमध्येही सत्तांतर होऊन एनडीए सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तविला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निर्बंध लावले आहेत. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर प्रवेशासाठी आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह बंधनकारक केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने निकालानंतर विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. याशिवाय विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवाराने दोनपेक्षा अधिक व्यक्ती सोबत नेऊ नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.