Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 10:14 IST2021-05-02T10:13:17+5:302021-05-02T10:14:12+5:30
Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, केरळमध्ये सत्ताबदल होणार नाही; संजय राऊत यांचा अंदाज

Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल
मुंबई: पाच राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरीत कोणाची सत्ता येणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या सुरुवातीचे कल हाती येत असून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर आसाममध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता राखेल अशी शक्यता आहे. केरळमध्येही सत्ताधारी डाव्यांनी मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना निकालाबद्दल त्यांचा अंदाज सांगितला आहे.
काँग्रेसची पिछेहाट, डावे सुस्साट, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत; केरळमध्ये इतिहास घडणार?
तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भारतानं जंगजंग पछाडलं. पण बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही. भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. देशात कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखतील. भाजपच्या जागा वाढणार असल्यानं त्याचा फटका तृणमूलला बसेल. गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होतील. पण काठावरचं का होईना, त्यांना बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केरळमध्ये डावे, तर आसाममध्ये भाजप सत्ता राखेल. पण तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सत्ताबदल होईल, असा अंदाज राऊत यांनी वर्तवला.