लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराला काॅंग्रेस पक्षानंतर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही तीव्र विरोध केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचे वाद राज्य सरकारने बाजूला ठेवायला हवे. आधीच जनता खडतर दिवसांना सामोरी जात असताना विकासाचे, विधायक मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांनी नामांतराचे मुद्दे रेटू नयेत, असे आठवले यांनी सांगितले.
औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहिले पाहिजे, त्याचे नामांतर करता कामा नये. या सरकारने औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणारा व्हिडीओ आठवले यांनी रविवारी जारी केला.नामांतरास विरोध का, यावर आपली भूमिका आठवले यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा वेळी नामांतरणासारखे मुद्दे आणू नयेत. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र, संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये. आम्ही १७ वर्षे नामांतराच्या आंदोलनाची धग भोगली आहे, असेही त्यांनी सांगितले.
नामांतराच्या विषयावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचे औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.खासदार संभाजी राजे यांनी नामांतराचे समर्थन केले असून औरंगाबादचे संभाजीनगर होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग काढू. - अजित पवार, उपमुख्यमंत्री