- पोपट पवारनिसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या देवभूमी केरळमध्ये लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, आलटून-पालटून राज्यावर सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्येच लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. डाव्यांच्या या बालेकिल्ल्यात तिसरा भिडू म्हणून शिरकाव करण्यास भाजपानेही जोरदार कंबर कसली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमित शहा यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी केरळमध्ये पायधूळ झाडली आहे.केरळमध्ये १९८० पासून काँग्रेस अणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सत्ता आलटून-पालटून उपभोगली आहे. माकपने डावी लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) माध्यमातून, तर काँग्रेसने संयुक्त लोकशाही आघाडीच्या (यूडीएफ) माध्यमातून सत्तेचा राजमार्ग स्वत:कडे ठेवला आहे. सध्याच्या लोकसभेलाही या दोन्ही पक्षांनी स्थानिक छोट्या पक्षांना सोबत घेत मतांचे विभाजन टाळले होते.मात्र, २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५.९ टक्के मते घेत या दोन्ही पक्षांची भंबेरी उडविली होती. राजगोपाल यांच्या रूपाने भाजपाने विधानसभेत खातेही उघडले होते. त्यामुळे मनोबल उंचावलेल्या भाजपाने येत्या लोकसभा निवडणुकीतही या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरची मदत घेतली आहे. यूडीएफ व एलडीएफच्या नाराजांवरही भाजपाने गळ टाकला आहे.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही केरळमध्ये मात्र यूडीएफ अणि एलडीएफ यांच्यातच तुल्यबळ लढत झाली होती. त्यात काँग्रेसप्रणीत यूडीएफने १२ जागांवर विजयश्री मिळविली होती, तर माकपच्या एलडीएएफला ८ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाने १७ लोकसभा मतदारसंघांत तिसºया क्रमांकाची मते घेतली होती, तर तिरुवनंतपूरममध्ये भाजपा उमेदवाराने दुसºया क्रमांकाची मते घेत काँग्रेसच्या शशी थरूरयांचा घाम काढला होता.लोकसभेच्या तोंडावरच एलजेडी, इंडियन नॅशनल लीग, डेमॉक्रेटिक केरळ काँग्रेस आणि केरळ काँग्रेस (पिल्लई) हे चार प्रादेशिक पक्ष एलडीएएफमध्ये सामील झाल्याने त्यांचे बळ वाढले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडेच लोकसभेची जबाबदारी देण्याच्या तयारीत माकप आहे. तर काँग्रेसप्रणीत यूडीएफची सूत्रे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याकडेच राहणार असली तरी लोकसभेच्या तोंडावर केसी वेणुगोपाल यांना काँग्रेसच्या महासचिवपदावर बढती देत उमेदवारी वाटपात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे सूचित केले आहे.घरोघरी जाण्याची काँग्रेसची मोहीमकाँग्रेसने केरळमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी केली असून त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना प्रचार कार्यक्रम ठरवून दिला आहे. पक्षाचे सचिव मुकुल वासनिक यांनी नुकतीच काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. काँग्रेसने केरळमध्ये 'घर टू घर' मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांची माहिती गोळा करण्याबरोबर एका कार्यकर्त्याला २५ कुटुंबांमध्ये जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
केरळमध्ये तापू लागले निवडणुकीचे वातावरण; पुन्हा काँग्रेस-डाव्यांमध्येच लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:01 AM