शीलेश शर्मानवी दिल्ली : हाथरस येथील कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला करताना पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी योगी सरकार आरोपींना संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. लोकांनी बाहेर पडून सरकारवर दडपण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘स्पीक अप इंडिया’ मालिकेत राहुल गांधी यांनी व्हिडिओ जारी करून म्हटले की, ‘‘समाजात परिवर्तन घडवायचे आहे. कारण आमच्या माता, भगिनींवर या देशात अन्याय केला जात असून त्याविरोधात देशभर आवाज बुलंद झाला पाहिजे.’’ राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे. सरकारचे काम अपराध्यांच्या संरक्षणाचे नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचे आहे. दुर्दैवाने असे होत नाही आणि त्यामुळेच मला हाथरसला जाण्यापासून अडवण्यात आले. ही वेळ एकत्र येण्याची आहे, म्हणजे एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने पडू शकेल.’’ राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘‘महिलांवरील अत्याचारांत वाढत आहेत, पीडित महिलांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना बदनाम करणे, त्यांच्यावरच आरोप करणे लाजिरवाणे कृत्य आहे.’’