- मनोहर कुंभेजकर
मुंबई : 2022 साली होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची नियुक्तीच अजून जाहीर झालेली नाही, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीला कसे सामोरे जायचे अशी कुजबुज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांना उमेदवारी देतांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची काँग्रेस हायकमांडने उचलबांगडी केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्याची जबाबदारी घेत देवरा यांनी राजीनामा दिल्याचे राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले होते. देवरा यांच्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यांनी देखिल वयाची 80 पार केली असून आगामी पालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आणि पालिका निवडुकीत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या प्रतीक्षेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नेमणूक हायकमांड कधी जाहीर करणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत मनहास व जेष्ठ कामगार नेते भाई जगताप यांच्यात चुरस आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजीत सप्रा यांची सुद्धा नावे चर्चेत आहेत. लोकमत ऑनलाइनने या संदर्भात दिलेले वृत्त मुंबईपासून दिल्लीपर्यंत व्हायरल झाले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी दि. 17 रोजी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत आणि 2022च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. सदर पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा सविस्तर अहवाल ते काँग्रेसच्या हायकमांडकडे ठेवला होता. मात्र अजून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या नियुक्ती जाहीर झाली नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. इतर प्रमुख पक्षांनी पालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असतांना काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीची तयारी कधी करणार अशी कुजबुज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सर्वांना घेऊन जाणारा नेता म्हणून डॉ. मनहास यांची ओळख असून मराठी चेहरा आणि आक्रमक कामगार नेते म्हणून भाई जगताप यांची ओळख आहे. संघटनात्मक दृष्ट्या डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून कार्यकर्त्यांकडून काम करून घेणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समजते. मनहास यांनी गेली 40 वर्षे काँगेस पक्षांशी एकनिष्ठ राहून एनएसयुआय, युवक काँग्रेस, 5 वेळा सिनेट सदस्य,2007 ते 2012 पर्यंत म्हाडाचे अध्यक्ष, तसेच 2003 ते 2015 पर्यंत मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते.
सध्या मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. म्हाडाचे अध्यक्ष असतांना 12000 मुंबईकरांना घर दिले होते.तर 2007 च्या पालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे 77 नगरसेवक निवडून आणले होते. त्यांना पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असून ते अध्यक्ष म्हणून अधिक यशस्वी ठरतील, असे मत सर्वाधिक जणांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्याकडे मांडल्याचे समजते.