मुंबई: काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली होती. यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. यानंतर जागा भरण्याचे आश्वासन देत तशा घोषणाही करण्यात येत आहे. यानंतर या तरुणाच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावरून हे संवेदना हरवलेले सरकार असल्याची टीका भाजपने केली आहे. (atul bhatkhalkar criticized govt over swapnil lonkar family meet cm uddhav thackeray)
या तरुणाचे नाव स्वप्नील लोणकर असून, त्याच्या कुटुबीयांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलच्या आई, वडिलांचे सांत्वन करत स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल. तसेच शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
“केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”; भाजपची टीका
हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार...
अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार..., या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, MPSC उत्तीर्ण झाल्यानंतरही मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल. या आशेवर घेतलेले कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर टोकाचे पाऊल उचलले.