ठाणे : कोव्हिडच्या काळात ठाणे महापालिकेला फक्त ६८ कोटी राज्य शासनाने दिले. ज्या महापालिकोवर सर्वात पहिला मुंबईच्याही आधी शिवसेनेचा झेंडा फडकला. त्या ठाणे महापालिकेला कोव्हिडच्या काळात मोठी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, अशी आशा होती. परंतु भगवाच गुंडाळून ठेवल्याने ठाणे महापालिकेच्या वाटेला देखील सावत्र भावाची वागणूक आली असल्याची टिका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
ठाण्यात महाविकास आघाडीच्या वर्षपुर्ती निमित्ताने विविध विषयांवर झालेल्या बिघाडीच्या विषयी ते बोलत होते. कोव्हिडच्या काळात ठाणे महापालिकेला अतिशय छोटी रक्कम मिळाली. २०११ च्या जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर ठाणे शहराच्या लोकसंख्येला, त्यानुसार कोव्हिडच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मागे राज्य सरकाराने ६०० रुपये सुद्धा खर्च करण्याचे औदार्य दाखविले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोव्हिडच्या काळात राज्य शासनाकडून मदत मिळावी या हेतून ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २५० कोटींची मदत मागितली होती. परंतु आता राज्यशासनाने ठाण्याच्या तोंडाला या अशा परिस्थितीतही पाने पुसण्याचाच प्रकार केल्याची टीका त्यांनी केली. अतिशय वाईट अवस्था राज्य शासनाने ठाणे महापालिकेची करुन ठेवली आहे. त्यातही कोव्हिडच्या काळात फक्त राज्य सरकार आणि महापालिकेने जे काही धान्य दिले. ते धान्य मात्र आपआपल्या भागामध्ये स्वत:चा फोटो लावून स्वत:च्या पक्षाचे चिन्ह लावून, ते वाटण्याचा कार्यक्रम याच मंडळींनी ठाण्यात केला आहे.
आयजीच्या जीवावर बायजी उधार तसाच काहीसा हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. परंतु या सर्व प्रकरणात देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. मदत ही शासनाची ती वाटतांना ती स्वत:च्या नावावर वाटण्यात आली. त्यातही ५० टक्केच मदत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी ही मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईत कोरोना आल्यानंतर तेथील परिस्थिती हातळताना कशा प्रकारे सामना करावा लागला याची जाण राज्यशासनाला होती. परंतु एवढे असतांनाही ठाणे आणि एमएमआर रिझनमध्ये कोव्हिडची परिस्थिती हातळण्यास त्यांना जमले नाही. मुंबईत ज्या पद्धतीने कोव्हिडच्या काळात अॅम्ब्युलेन्स न मिळणे, मृतदेहांची आदलाबदल होणे, वेळवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यु असे प्रकार घडले. तेच प्रकार पार्ट टू मध्ये ठाणे आणि एमएमआर रिझनमध्येही घडल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणारठाणे महापालिकेचा कारभारही सध्या चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. त्यांच्या अनेक चुका भाजपाने दाखवून दिलेल्या आहेत. कोव्हिडच्या काळात महापालिकेत आयुक्त दोन दोनदा बदलणे, मदतीचा आभाव, दोन मंत्र्यांच्या अलौकीक कथा चर्चील्या जात आहेत. नागरी सोई सुविधा कमी पडलेल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात किंवा कल्याण डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका असो कुठेही आम्ही कमी पडणार नसून भाजपा या सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. तसेच ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांवर देखील भाजपाचा झेंडा फडकेल असा दावाही त्यांनी केला.