मुंबई – औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण संपण्याची चिन्हे दिसत नाहीत, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद येथील वैद्यकीय खात्यासंदर्भात निर्णय झाला, याची माहिती देताना CMO च्या ट्विटर हॅंडलवरून मंत्री अमित देशमुख यांच्यासह संभाजीनगर(औरंगाबाद) असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं.
याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे अशी तंबी दिली होती.
तर शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे अशा शब्दात काँग्रेसनं शिवसेनेला ठणकावून सांगितलं होतं. यावर गुरूवारी माध्यमात जोरदार चर्चा झाली. शिवसेनेने याबाबत मौन बाळगले होते.
CMO च्या ट्विटरवर पुन्हा संभाजीनगर उल्लेख
औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख केल्याचा मुद्दा दिवसभर माध्यमात झळकत असताना संध्याकाळी पुन्हा CMO च्या ट्विटर हॅडलवर त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या असं विधान त्यांनी केले. त्यामुळे शिवसेनेकडून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न झाला का? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.
चुकून टाइप झालं असेल, समज देऊ – अस्लम शेख
गुरूवारी सकाळी माध्यमात या संदर्भात बातम्या आल्या तेव्हा काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सावध प्रतिक्रिया देत 'कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ' असं सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.