मुंबईऔरंगाबादच्या नामांतरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं नामांतरणाच्या वादाला फोडणी मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवकर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. मुंबईज आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध आहे. त्यात काँग्रेसच्याच मंत्र्याच्या पोस्टरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करावे या मागणीवर शिवसेना ठाम आहे. पण शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसचा यास विरोध आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध केला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याच्या विषयावर आमचा विश्वास नाही, असं थोरात यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे शिवसेना औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यावर ठाम आहे. औरंगजेब हा तुमचा आदर्श आहे का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली होती.