मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळा, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव आहे’ असे विधान पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी ही मुलाखत घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये या मुलखतीचा थेट उल्लेख केला नाही पण त्यांनी म्हटले की, आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून आघाडीतील मित्र पक्षांना मी सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णय क्षमतेचा परिपाक आहे, असे ठाकूर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
ट्विटबाबत बोलणे टाळले या संदर्भात लोकमतने ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या ट्विटचा संदर्भ पवार यांच्या मुलाखतीशी असल्याचा इन्कार केला. मग हा संदर्भ कोणाबाबत आहे, असे विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले.