प्रविण मरगळे
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एरव्ही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नेहमी चर्चेत आणि स्पर्धेत असतात. मात्र कोणालाही ठाऊक नसताना दिल्ली हायकमांडच्या आदेशावरुन फारसं चर्चेत नसणारं नाव थेट मुख्यमंत्रिपदासाठी निवडलं गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव जास्त परिचितही नाही. मात्र सिमेंट घोटाळ्यात बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं, त्यावेळी वसंतदादा पाटील हे या पदासाठी प्रमुख दावेदार होते, मात्र दिल्ली हायकमांड म्हणजे इंदिरा गांधी यांनी सगळ्यांनाच धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं.
२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ या अल्पकालीन मुख्यमंत्रिपदाची धुरा बाबासाहेब भोसले यांनी सांभाळली होती. खरंतर बाबासाहेब भोसले यांचे मुख्यमंत्री होणं हा राजकीय अपघातच असल्याचं बोललं जात असे. कारण खुद्द बाबासाहेब भोसले यांनाही मुख्यमंत्रिपद मिळेल याची खात्री नव्हती. त्यांची कारकिर्द १ वर्षाची होती, परंतु या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अंतुले यांच्यानंतर राज्याला मराठा मुख्यमंत्री द्यावा असं इंदिरा गांधी यांनी ठरवलं, त्यावेळी साताऱ्याचे अभयसिंह राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं पण चुकून बाबासाहेब भोसले यांचे नाव त्यांनी घोषित केलं असावं अशी चर्चा तेव्हाच्या राजकीय वर्तुळात होती.
बाबासाहेब भोसले यांचा जन्म १५ जानेवारी १९२१ रोजी सातारच्या तारळे गावात झाला. त्यांचे वडील अनंतराव सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. अगदी तरुण वयातच बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात त्यांनी काम केले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात अनेक नेत्यांची धरपकड ब्रिटीश सरकारने केली, त्यात बाबासाहेब भोसले यांनाही दीड वर्षाचा तुरुंगवास झाला. माहितीनुसार, बाबासाहेब भोसले यांचा साखरपुडा तुरुंगातच झाला होता, स्वातंत्र्यसैनिक तुळसीदास जाधव हे येरवडा तुरुंगात होते, त्यांची कन्या कलावती आणि बाबासाहेब यांना साखरपुडा तुरुंगाधिकाऱ्याच्या परवानगीने तुरुंगात झाला होता.
स्वातंत्र्य चळवळीपासून बाबासाहेब भोसले काँग्रेसशी जोडले गेले होते, १९७८ मध्ये ते मुंबईतील कुर्ला नेहरुनगर विधानसभा मतदारसंघात उभे होते, मात्र त्यांचा पराभव झाला, पण त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत ते कुर्ला नेहरुनगर मतदारसंघातून आमदार बनले आणि अंतुले यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी चर्चेत नसलेल्या बाबासाहेब भोसलेंना थेट मुख्यमंत्री बनवले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ मग दिल्ली हायकमांडची भेट
बाबासाहेब भोसले हे दिलखुलास, हजरजबाबी विनोदी व्यक्तिमत्व होतं, काँग्रेस काळात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आधी दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेत त्यानंतर मुंबई येऊन शपथ घेत होते, मात्र बाबासाहेब भोसलेंनी आधी शपथ घेतली मग दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट घेतली. पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारलं असता, ते मिश्किलपणे म्हणाले की, बाबांनो, वेळीच शपथ घेऊन टाकलेली बरी, ही काँग्रेस आहे, इथे शपथ घेतल्यानंतर राज्यपालांसमोर रजिस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सही करण्याचा मधला वेळ असतो, त्यावेळतही मागच्या मागे कोट ओढून माघारी बोलावले जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं होतं.
मी कायमचा माजी मुख्यमंत्री झालो
बाबासाहेब भोसले यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अवघ्या १ वर्षाचा होता, पक्षातील आमदारांना नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने अखेर हायकमांडने त्यांची उचलबांगडी केली, बाबासाहेब भोसले यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री बनवले, त्यावेळीही हसत हसत बाबासाहेब भोसले म्हणाले की, माझं मुख्यमंत्रिपद काढून घेतलं, पण आता माझ्या माजी मुख्यमंत्री हे पद कायमचं लागलं, ते मात्र कुणीही काढू शकत नाही असं विधान त्यांनी केलं.
बाबासाहेब भोसले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय
बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते, त्यांची कारकिर्द १३ महिन्यांची होती, या काळात त्यांनी असंघटित कामगारांसाठी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना, मच्छिमारांसाठी विमा योजना, मंत्र्यांच्या पगारात कपात, कोल्हापूरात मराठी चित्रपट निर्मितीसाठी चित्रनगरी, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना, दहावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले, कालांतराने बाबासाहेब भोसले यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारुन शिवसेनेत प्रवेश केला होता, वयाच्या ८६ व्या वर्षी ६ ऑक्टोबर २००७ रोजी बाबासाहेब भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.