मुंबई - बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भीती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे.यासंदर्भात बोलताना दलवाई म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात हजारो निष्षापांचा बळी गेला. १५ लाख लोक अयोध्येला जमा झाले होते. ते कोणाच्या नेतृत्वाखाली तिथे आले होते? इतकेच नव्हे तर अनेक जण मशिद तोडण्यासाठी लागणारी अवजारेसुद्धा घेऊन गेले होते. याचे पुराव्यासह वृत्तांकन वृत्तपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिले आहे. तरीही या कटात सहभागी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते हे अत्यंत धक्कादायक व अनाकलनीय आहे.या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ठ लोकांना अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते असे दलवाई म्हणाले.
सगळेच निर्दोष असतील, तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का?; ओवेसींचा सवालबाबरी मशीद प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष आहेत. मग बाबरी मशीद कोणी तोडली. ती जादूनं पडली का?, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर विश्वास असणाऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश आज देण्यात आला, अशा शब्दांत ओवेसींनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.