पुणे – महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्र उभारलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) हस्ते पुण्यात या केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. राज ठाकरे प्राणी संग्रहालयात येणार समजताच अनेक कार्यकर्त्यांनी तसेच प्राणीप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात इथं हजेरी लावली होती.
राज ठाकरेंच्या या भेटीदरम्यान सर्पमित्र नीलम कुमार खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ऐकवला. बाळासाहेबांनी कशाप्रकारे एका सापाचे प्राण वाचवले ते सांगितले. खैरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे एकदा माथेरानला आले होते. तेव्हा तुम्ही नव्हता. पण तुमची बहीण आणि आई होती, उद्धव ठाकरेही होते. त्यावेळी ते ११ वर्षांचे असतील. माझ्या इथं साप बघून ते २ किमी अंतरावरील पॅनरोमा पाँईंटवर जायला निघाले होते. तेव्हा वाटेत काही घोडेवाल एकाला सापाला मारताना दिसले. बाळासाहेब तिथे गेले त्यांनी घोडेवाल्यांना काय करता सरका बाजूला व्हा, म्हणत आपल्या खिशातून रुमाल काढला तो साप पकडला. त्यानंतर पॅनरोमाला न जाता परत माझ्याकडे आले असं त्यांनी सांगितले.
इतकचं नाही तर मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय हे घ्या असं बाळासाहेब म्हणाले. मी हात पुढे केला तर त्यांनी माझ्या हातावर साप टेकवला. तो फुरसुंग प्रजातीचा साप होता. मी म्हटलं अहो, साहेब हा साप विषारी आहे. त्यावर बाळासाहेबांनी त्याने मला काही केलेलं नाही, सांभाळा आता याला म्हणत त्या सापाची जबाबदारी माझ्यावर टाकली. निसर्गमित्र बाळासाहेब नावाचा एक लेख लिहिला होता असंही नीलम खैरे यांनी राज ठाकरेंना सांगितले.
...अन् राज ठाकरेंनी मास्क घातला
राज ठाकरे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मंगळवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मी मास्क घालतच नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या राज ठाकरेंनी मास्क लावलेला होता. यावेळी राज यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लेखाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याचच आठवड्यात वयाची ९९ वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांचे वयोमान आणि कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावला होता.