"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

By मोरेश्वर येरम | Published: January 17, 2021 03:35 PM2021-01-17T15:35:13+5:302021-01-17T15:46:25+5:30

बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केलं आहे. 

balasaheb thorat attacks shiv sena and bjp over aurangabad renaming issue | "पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

Next
ठळक मुद्देऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन बाळासाहेब थोरात यांची टीकाशिवसेनेला फक्त मतांची चिंता असल्याचं केलं वक्तव्यढोंगीपणा हा भाजपचा स्वभाव; लोक त्यांच्याकडे करमणूक म्हणून पाहतात, असं थोरात म्हणाले

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन 'सामना'मधून केलेल्या टीकेला 'रोखठोक' प्रत्युत्तर दिलं आहे. यात थोरात यांनी शिवसेनेसोबत भाजपवरही निशाणा साधला आहे. 

"मागील पाच वर्षांपासून सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. भाजपचा हा ढोंगीपणा सुरू आहे", अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा 'सामना' सुरू आहे, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केलं आहे. "औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मागील ५ वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाहीतर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का?", असं थोरात यांनी पत्रक काढून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. 

"शिवसेनेला मतांची चिंता"
बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना म्हटलं की, "राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले तर ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून पाहते", अशी शेलक्या शब्दांत थोरात यांनी टीका केलीय. 

महाविकास आघाडी सरकार स्थिर, भाजपला टोमणा
नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याच्या भाजपच्य टीकेलाही थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं. थोरात यांनी यावेळी शिवसेनेला टोला लगावला असला तरी सरकार स्थिर असल्याचंही आवर्जुन स्पष्ट केलं आहे. "महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही", असं थोरात यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: balasaheb thorat attacks shiv sena and bjp over aurangabad renaming issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.