बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार; दिल्लीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:33 AM2021-01-05T06:33:08+5:302021-01-05T06:33:28+5:30

Balasaheb Thorat : अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना  मिळेल का याविषयी शंका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या विषयी काय निर्णय होतो, याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Balasaheb Thorat to step down as Congress state president | बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार; दिल्लीत दाखल

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार; दिल्लीत दाखल

Next

अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी असलेल्या नाराजीमुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली आहे.


 पाटील मराठीत फारसे बोलत नाहीत. त्यांचे इंग्रजीत बोलणे अनेक आमदारांना समजत नाही. पक्षाचे चिटणीस बी.एम. संदीप हेदेखील कर्नाटकचे आहेत. तर वामशी रेड्डी आणि संपत कुमार हे तेलंगणाचे आहेत. हे चौघेही अहिंदी भाषिक असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचणी येत असल्याचे  काही आमदारांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षांना न कळवता परस्पर बैठका होतात. निर्णय होतात. त्यानंतर त्याची माहिती प्रदेशाध्यक्षांना मिळते. हा थोरात गटात नाराजीचा विषय आहे. थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे नेतेपद आणि महसूल मंत्री अशी तीन पदे आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे द्यावी, असे त्यांना वाटत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण त्यांनी आजच त्याचा इन्कार केला आहे.  तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या पदासाठी उत्सुक नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद द्यावे, असा आग्रह सुरुवातीला धरल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदावरून सतत होणाऱ्या चर्चांना विराम देण्यासाठी, नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीत आल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थोरात यांच्यावर विशेष मर्जी असली, तरीही विधान परिषदेच्या नावांसाठी त्यांचे फारसे ऐकले गेले नाही. 


शिवाय मुंबई कॉंग्रेसमध्ये जे बदल झाले त्यातही त्यांना फारसे विचारले गेले नाही, असाही एक सूर आहे. त्यात बांधकाममंत्री अशोक चव्हाण गटाची सरशी झाल्याचे बोलले जाते. पण मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मराठा समाजाकडे गेले. या निर्णयामुळे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अन्य कोणाकडेतरी द्यावे, अशी चर्चा सुरू झाली. 
अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना 
मिळेल का याविषयी शंका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या विषयी काय निर्णय होतो, याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेते
n प्रदेशाध्यक्षांना डावलून प्रभारींकडून आमदारांना बोलावले जाते, बैठका घेतल्या जातात, असा त्यांच्या तक्रारींचा सूर आहे. शिवाय सीमाप्रश्नी कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेते अशी पाटील यांची ओळख आहे. 
n महाराष्ट्रात ही गोष्ट काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे प्रभारीच बदलण्याची गरज असल्याची चर्चा दिल्लीच्या कानावर घालण्यासाठी थोरात गेल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
 

Web Title: Balasaheb Thorat to step down as Congress state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.