मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सरकारमध्ये मंत्री, पक्षाचे विधिमंडळ नेते आणि प्रदेशाध्यक्ष अशी तिहेरी जबाबदारी सांभाळत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त काल आले होते. राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही चर्चा फेटाळून लावली आहे. तसेच ही बातमी कुठून आली हे माहित नाही. या बातमीचा स्रोत शोधावा लागेल, असेही ते म्हणाले.दरम्यान, पक्षाला आपल्यावर अधिक जबाबदारी असल्याचे वाटून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरील जबाबदारी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास पक्ष जो निर्णय घेईल आणि जी जबाबदारी माझ्यावर दिली जाईल, ती स्वीकारण्यास मी तयार असेन, असे थोरात यांनी सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी. नवे नेतृत्व समोर आणावे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, असेही थोरात म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद, विधिमंडळ नेते आणि प्रदेशाध्यक्ष अशी तिहेरी भूमिका सांभाळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केल्याचे वृत्त काल आले होते. त्यासाठी थोरात यांच्या दिल्लीवारी केल्याचेही सांगण्यात येत होते.सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण त्यांनी त्याचा इन्कार केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण, म्हणाले
By बाळकृष्ण परब | Published: January 05, 2021 11:46 AM
Balasaheb Thorat News : सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे केले खंडन मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी. नवे नेतृत्व समोर आणावे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू