अकोला : वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. बुधवारी मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही प्रवेश घेतला.भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोठा धक्का बसणार हे निश्चित झाले होते. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी ‘वंचित’मधून बाहेर पडत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोघांचाही प्रवेश लांबल्याने त्यांच्या प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्ये त्यामुळे दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडीनेही या दोघांच्या प्रवेशात अडचणी निर्माण करण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे कोरोना व वादळाच्या धोक्यातही अखेर बुधवारी प्रवेशाची अनिश्चितता संपवत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.
सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:40 PM
माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.
ठळक मुद्दे‘वंचित’मधून बाहेर पडत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही प्रवेश घेतला.