चेन्नई : द्रमुक पक्षाचे नेते, खासदार ए. राजा यांना मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्याविरोधात केलेली खालच्या पातळीची टीका महागात पडण्याची चिन्हे आहेत. ए. राजा यांना विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यावर बंदी घालावी अशी मागणी अण्णा द्रमुक पक्षाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे.तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी एका मतदारसंघात प्रचार करताना खासदार ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यावर आक्षेपार्ह व खालच्या पातळीची टीका केल्याचा आरोप अण्णा द्रमुक पक्षाच्या कायदा विभागाच्या सहसचिवांनी लावला आहे. राजा यांना प्रचार करण्यावर बंदी घालावी. त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार द्यावी. तसेच त्यांचा खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अण्णा द्रमुकने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ आणि स्थानिक माध्यमात प्रसारित झालेल्या बातम्यांची कात्रणे अण्णा द्रमुक नेत्यांनी आपल्या तक्रारीसोबत जोडली आहेत. दरम्यान द्रमुकप्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी दिलेल्या निवेदनात प्रचार दरम्यान विरोधी नेत्यांचा आदर सन्मान ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण त्यांनी निवेदनात कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.ए. राजा यांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफीचेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंंत्री ई. पलानीसामी यांच्या दिवंगत आईविषयी केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल द्रमुकचे नेते, खासदार ए. राजा यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली. आपल्या वक्तव्याचा विपर्यहास करण्यात आल्याचा दावा ए. राजा यांनी केला. रविवारी एका सभेदरम्यान मुख्यमंत्री पलानीसामी हे टीकेवरून भावूक झाले होते. हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता असल्याने राजा यांनी माफी मागत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.गुडलूर येथील जनसभेत राजा यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करण्याचा उद्देश देखील नव्हता. आपण एका मुलाचे उदाहरण देत पलानीसामी आणि एम. के स्टॅलिन यांच्यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. पलानीसामी हे त्यामुळे व्यथित झाल्याचे ऐकून मला दुख झाले. मी त्याबद्दल माफी मागतो असे ए. राजा यांनी सांगितले. शुक्रवारी एका सभेदरम्यान ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीसामी यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून तमिळनाडूच्या राजकारण वाद पेटला होता. द्रमूक नेते एम. के स्टॅलिन यांनी याची दखल घेत नेत्यांनी टीका करताना विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवावा, असा कोणाचेही नाव न घेता सल्ला दिला होता. तमिळनाडूतील इतर पक्ष, नेत्यांनी सुद्धा राजा यांच्या टीकेचा निषेध केला होता.
ए. राजा यांच्या प्रचारावर बंदी घाला, अण्णा द्रमुकची निवडणूक आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:57 AM