पनवेल : देशाच्या सीमा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाखिचडी आघाडीला धडा शिकवा. या निवडणुकीमध्ये बारामतीसह माढा हादरला आहे. बारामतीचे पार्सल तुमच्याकडे आले आहे ते परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये सभेचे आयोजन केले होते, या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. या पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेतली जात होती. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात आले. पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती; पण तेव्हाच्या सरकारमध्ये ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत आहे. विरोधकांची अवस्था बिकट झाली आहे. शरद पवार यांनी माढाच्या पिचवरून पळ काढला. कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ते म्हणाले....तर रॉकेटसोबत नेता पाठविला असतापाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक जगातील सर्वांनी मान्य केला. फक्त पाकिस्तान व महाखिचडी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मान्य नाही. हल्ल्याचे पुरावे मागत आहेत. मी गमतीने त्यांना म्हणालो की, तुम्ही पुरावे मागणार हे माहीत असते तर रॉकेट सोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठविला असता व प्रत्यक्ष बघा म्हटले असते, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
बारामतीचे पार्सल बारामतीला परत पाठवा- फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:15 AM