असिफ कुरणेपाटणा : बिहारमध्ये विरोधकांचे महागठबंधन विरुद्ध सत्ताधारी एनडीए अशा अनेक थेट लढती असल्या तरी बेगुसरायची लढत मात्र तिरंगी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू ) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार हा भाकप (सीपीआय) तर्फे मैदानात उतरला आहे. त्याच्या उमेदवारीमुळे बेगुसराय येथील सामना हा सामान्य विरुद्ध दिग्गज यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला असून, इथे २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.बिहतमधील अंगणवाडी सेविकेचा सामान्य मुलगा ते दिल्लीतील जेएनयूच्या छात्रसंघाचा अध्यक्ष, तेथून तिहार जेल ते बेगुसराय असा प्रवास करत कन्हैयाकुमार मैदानात उतरला आहे. त्याने केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते गिरीराज सिंह व राजदचे तनवीर हसन यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. गिरीराज सिंह विजयी झाल्यास, त्यांचे राज्यातील स्थान बकळट होईल. पण कन्हैयाकुमार जिंकल्यास तो जायंट किलर ठरेल. बिहारमध्ये कमी झालेला भाकपाचा जनाधार वाढवण्यासाठी हा विजय मदतीचा ठरू शकतो.गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत डॉ. भोला सिंग यांनी आरजेडीच्या तनवीर हसन यांचा ५८ हजार मतांनी पराभव केला. भाकपच्या राजेंद्र प्रसाद सिंग यांना तिसऱ्या क्रमांकाची १ लाख ८२ हजार मते मिळाली. यंदा गिरीराज सिंह यांनी सुरुवातीला येथून लढण्यास नकार दिला होता. पण पक्षाच्या दबावामुळे त्यांना मैदानात उतरावे लागले. तनवीर सिंग गेली पाच वर्षे निवडणुकीची तयारी करत आहेत. बिहारचे लेनिनग्राड अशी ओळख असलेल्या बेगुसरायमध्ये डाव्यांची लक्षणीय मते आहेत. कन्हैयाकुमारला 'आझादी' प्रकरणानंतर मिळालेली प्रसिद्धी कौतुकाचा विषय बनली आहे. त्याच्यामुळेच या मतदारसंघाला एवढे वलय लाभल्याची मतदारांची भावना आहे. कन्हैयाकुमारसाठी जेएनयूचे विद्यार्थी, शहीला रशीद, जिग्नेश मेवानी , अभिनेत्री स्वरा भास्कर तसेच काही फिल्ममेकर प्रचारात उतरले आहेत. गरीब कुटुंबातील कन्हैयाच्या निवडणूक खर्चासाठी क्राउड फंडिंगद्वारे तब्बल ७० लाख रुपये जमा झाले आहेत.>आरजेडीने टाळले : महागठबंधनकडून कन्हैयाकुमार यांच्या उमेदवारीसाठी सुरुवातीला प्रयत्न झाले. लालूप्रसाद यादव यांनीही हिरवा कंदील दाखवला. पण तेजस्वी यादवना कन्हैयाकुमार अडचणीचे वाटतात. त्यामुळेच त्यांनी तडजोड न करता आरजेडीचा उमेदवार दिला. भूमिहार समाजात प्रसिद्ध होत असलेले कन्हैयाकुमार भविष्यात वरचढ ठरतील या भीतीनेच तेजस्वी यादवनी त्यांना उमेदवारी देण्याचे टाळले, असे बोलले जाते.>जातीय गणिते महत्त्वाचीबेगुसरायमध्ये भूमिहार समाजाचे प्राबल्य आहे. गिरीराज सिंह ४ कन्हैयाकुमार भूमिहार आहेत. तिथे मुस्लीम व यादव यांची संख्याही मोठी आहे. हे समाज तनवीर हसन यांचे समर्थक मानले जातात. कोण कोणाची किती मते खातो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे तिन्ही उमेदवारांचा कस लागला आहे. गेल्या, २०१४ मध्ये भरभरून मते देणाºया या मतदारासंघाने २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही आमदार दिला नाही. भाजपच्या मतात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे लढत तनवीर हसन विरुद्ध कन्हैयाकुमार अशीच होण्याची चिन्हे आहेत.
बेगुसरायची लढाई सामान्य विरुद्ध दिग्गजांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:29 AM