- अण्णा नवथरराज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे अहमदनगर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. भाजपकडून डॉ. सुजय विखे, तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप अशी ही लढत असून, राधाकृष्ण विखे आणि शरद पवार या दोघांच्याही प्रतिष्ठेचा हा सामना आहे.अहमदनगरमध्ये सुजय हे गत दोन वर्षांपासून तयारी करीत होते़ मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्याने त्यांनी पक्षांतर करून भाजपचा झेंडा हाती घेतला. विखे यांचे काँग्रेसमधील काही समर्थकही भाजपात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस काहीशी दुभंगली आहे. सुजय यांच्या पाठिशी भाजप-सेना व त्यांचे काँग्रेसमधील समर्थक अशी गोळाबेरीज आहे.सुजय हे न्युरो सर्जन असून तरुण आहेत. आपल्या शिक्षणाचा मुद्दा ते भाषणांमध्ये मांडत आहेत. सेना-भाजपच्या नेत्यांची त्यांनी मोट बांधली आहे. संग्राम हेही तरुण असून, त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन तरुणांमध्ये ही लढत आहे. दोन्हीही बाजूने प्रचारात जोरदार रंग भरला आहे़ सुजय यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नेते कामाला लावले आहेत. विखेंना भाजपमध्ये घेऊन आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेत सांगितले. मात्र, राधाकृष्ण विखे अद्याप भाजपमध्ये गेलेले नाहीत. सुजय यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज आहेत. त्यांची बंडखोरी थोपविण्यात विखे यांना यश आले आहे. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले हेही भाजपचे आमदार आहेत. ते विखे यांच्या प्रचारात सक्रिय दिसतात. त्यांची अडचण झाली आहे.
अहमदनगरमध्ये विखे-पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:18 IST