मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. तसेच, याप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.
'प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही', या शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. अर्थात हे विधान करताना श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतलेले नाही.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारीला फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
धनंजय मुंडें यांचा तूर्तास राजीनामा नाहीगुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनाम्यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे समजते. तर पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच, मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
या प्रकरणाला वेगळं वळणमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला ही ब्लॅकमेलर आहे, तिने आमच्यासोबतही अशाचप्रकारे हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांनीही महिला ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, तिने माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केलेल्याचे अनेक मेसेज आहेत असा दावा केला होता, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.