Belgaum Election Result 2021: भाजपा उमेदवार मंगला अंगडींची घोडदौड; 12,643 मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:43 PM2021-05-02T13:43:28+5:302021-05-02T13:44:57+5:30
Belgaum Election Result 2021: टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज महाविद्यालयामध्ये कडेकोट बंदोबस्तात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले असून आज मतमोजणी प्रसंगी सकाळी 11:30 वाजेपर्यंत भाजप उमेदवार मंगला सुरेश अंगडी या 1 लाख 62 हजार 687 मतांसह आघाडीवर होत्या. तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी हे 12643 मतांनी पिछाडीवर होते. समिती उमेदवार शुभम शेळके 42,662 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज महाविद्यालयामध्ये कडेकोट बंदोबस्तात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मंगला सुरेश अंगडी (भाजप), सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी (काँग्रेस) आणि शुभम विक्रांत शेळके (म. ए. समिती -अपक्ष) या तीन प्रमुख उमेदवारांसह एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी 7 वाजता मतमोजणी केंद्रातील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्यानंतर 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला.
(Belgaum Election Result: शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी, मंगल अंगडी आघाडीवर )
मतमोजणी आज सकाळी 11:30 वाजेपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण मतमोजणीच्या फेऱ्यांपैकी पुढीलप्रमाणे मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. अरभावी 67 पैकी 26 फेरा पूर्ण 61 शिल्लक, गोकाक 88 पैकी 26 फेऱ्या पूर्ण 63 शिल्लक, बेळगाव उत्तर 85 पैकी 24 फेऱ्या पूर्ण 61 शिल्लक, बेळगाव दक्षिण 84 पैकी 25 फेऱ्या पूर्ण 59 शिल्लक, बेळगाव ग्रामीण 89 पैकी 30 फेऱ्या पूर्ण 59 शिल्लक, बैलहोंगल 67 पैकी 25 फेऱ्या पूर्ण 42 शिल्लक, सौंदत्ती 71 पैकी 28 फेऱ्या पूर्ण 43 शिल्लक आणि रामदुर्ग 73 पैकी 29 फेऱ्या पूर्ण 44 शिल्लक.
या मतमोजणीमध्ये भाजप उमेदवार मंगला अंगडी 1,62,687 मतांसह आघाडीवर होत्या. त्यांच्यामागोमाग काँग्रेसचे सतीश जारकीहोळी 1,50,044 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि शुभम शेळके 42,662 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. थोडक्यात सकाळी 11:30 वाजेपर्यंत मंगला अंगडी या आपले नजीकचे प्रतिस्पर्धी सतीश जारकीहोळी यांच्यापेक्षा 12,643 मतानी आघाडीवर होत्या. निवडणुकीतील अन्य उमेदवारांपैकी विवेक घंटी यांना 1689 मते, श्रीकांत पडसलगी यांना 1636 मते, नागाप्पा कळसन्नावर यांना 1091 मते, श्री व्यंकटेश्वर महास्वामी यांना 716 मते, महालिंगन्नावर सुरेश बसप्पा यांना 660 मते आणि गौतम कांबळे यांना 523 मते पडली होती.