Belgaum Election Result: शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी, मंगल अंगडी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:18 PM2021-05-02T12:18:05+5:302021-05-02T12:19:20+5:30
Belgaum Election Result 2021: काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती.
बेळगाव - काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती. मात्र मतमोजणीला चार तास उलटत असताना समोर येत असलेल्या कलांमुळे या निवडणुकीत आता भाजपा हळुहळू मुसंडी मारताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाच्या मंगल अंगडी यांनी आघाडी घेतली आहे. तर शिवसेनेने पाठिंबा दिलेले महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवार शुभम शेळके हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. (Belgaum Election Result 2021)
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सध्या समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाच्या मंगल अंगडी यांना १ लाख ७६ हजार ५१२ मते मिळाली आहे. तर काँग्रेसचे सतीश जरकीहोळी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना १ लाख ६७ हजार ५४ मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४५ हजार ७२१ मते मिळाली आहेत.
भाजपाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. दरम्यान, कर्नाटकमधील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्येही भाजपाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपा उमेदवार शरणू सलगर यांना १५ हजार ५२ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार माला बी. नारायणराव यांना ७९०० मते मिळाली आहेत. तर जनता दल सेक्युलरचे उमेदवार सय्यद यासरूब अली काद्री यांना ११५८ मते मिळाली आहेत.