Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 16:16 IST2021-05-02T16:14:31+5:302021-05-02T16:16:30+5:30
Belgaum Election Result 2021 : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात धक्कादायक बदल दिसून येत आहे.

Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले
बेळगाव - बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात धक्कादायक बदल दिसून येत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या भाजपाच्या उमेदवार मंगल अंगडी या आता पिछाडीवर पडल्या आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जरकीहोळी यांनी जोरदार मुसंडी मारत १० हजारांची आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनाही भरभरून मतदान झाले असून, शेळके यांनी आतापर्यंत ९४ हजार ७२७ मते मिळवली आहेत.
काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती. मात्र सहानुभूतीच्या लाटेमुळे सुरुवातीच्या कलांमध्ये मंगल अंगडी यांनी आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणी पुढे सरकत गेल्यावर काँग्रेसचे उमेदवार सतीश जरकीहोळी यांनी पिछाडी भरून काढली. आताच्या क्षणाला सतीश जरकीहोळी हे ३ लाख ५५ हजार ८८९ मतांसह आघाडीवर आहेत. तर भाजपाच्या मंगल अंगडी या ३ लाख ४५ हजार ७४९ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर शुभम शेळके ९४ हजार ७२७ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भाजपाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.