बेळगाव - अत्यंत चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मंगल अंगडी यांनी कांग्रेसच्या सतीश जरकीहोळी यांचा अवघ्या ५ हजार २४० मतांनी पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यांनीही जोरदार लढत दिली. भाजपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत शेळके तिसऱ्या स्थानी राहिले. मात्र शेळके यांनाही मतदारांनी भरभरून मदतान करताना तब्बल १ लाख १७ हजार १७४ मतांचे दान त्यांच्या पदरात टाकले. (Maharashtra Ekikaran Samati Shubham Shelke defeated, but voters donated over one lakh 17 thousand votes)
लोकसभा पोटनिवडणूकित महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा उमेदवार शुभम शेळके यांनी १ लाख १७ हजार मते मिळवत नवीन इतिहास रचला. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शेळके यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण बेळगाव मध्ये ४४ हजाक ९५० बेळगाव उत्तर मध्ये २४ हजार ५९४ तर बेळगाव ग्रामीण मधून ४५ हजार ५३६ मते मिळवत दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा घाम काढला आहे.
भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगलेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारामुळे रंगत आणली होती. त्यात शिवसेनेने शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याने एकीकरण समितीच्या उमेदवाराचे बळ अधिकच वाढले होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शुभम शेळकेंचा प्रचार केला होता.