बेळगाव – लोकसभेसाठी रिक्त झालेल्या जागेवर आज मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा लढा उभा राहिला. जे आमच्याविरोधात प्रचारासाठी बेळगावात आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्र्द्रोही असल्याचं सिद्ध केलं असा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना(BJP Devendra Fadnavis) लगावला आहे. शुभम शेळकेंनी मतदान करून बाहेर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शुभम शेळके(Subham Shelke) म्हणाले की, महाराष्ट्रात सामील होणं हेच आमचं ध्येय आहे. कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. शिवाजी महाराजांचा अपमान आणि भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसांमध्ये चीड आहे. लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणं ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत बेळगाव प्रश्नाशी काँग्रेस आणि भाजपाला देणंघेणं नाही. हा प्रश्न काँग्रेसने उभा केला. ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते तेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. जोपर्यंत सीमावासियांचा प्रश्न सुटत नाही. त्यांच्यावरील अन्याय थांबत नाही तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शुभम शेळके यांनी दिली.
शुभम शेळके स्पॉन्सर्ड उमेदवार
महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा करत नाही. सध्या त्यांच्या प्रचारात एकही जुने पदाधिकारी दिसत नाही. इथला मराठी माणूस भाजपाला मतदान करतो. ही मतं कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार उभा करण्याचं काम काही लोकांनी केले आहे असा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता.
काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेनेचा प्रचार
संजय राऊतांचा अजेंडा सध्या काँग्रेसला जिंकवणं एवढाच आहे. त्यासाठी बेळगावात प्रचाराला आले. पोटनिवडणुकीत एक वरिष्ठ नेत्याचं निधन झालं आहे. त्यांची पत्नी याठिकाणी उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही हे माहिती आहे. त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवली नाही. अलीकडच्या काळात शिवसेना काँग्रेस यांची जवळीक वाढली आहे. मुंबईत शिवसैनिक टीपू सुलतान जयंती साजरी करतात तर इथं काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते. त्यामुळे टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यांना जिंकवण्यासाठी संजय राऊत बेळगावात प्रचाराला आले होते असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला होता.