कोलकाता : आगामी निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. मात्र, आता त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी आतापासून राजकीय धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
मला नंदीग्राममधून निवडणूक लढवायची आहे, असे यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी हे आवाहन स्टेट युनिटच्या अध्यक्षांना स्टेजवरच केले आणि तेथे तातडीने याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, यंदाही राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
याचबरोबर, रॅलीत ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले शुभेंदु अधिकारी यांच्यावर निशाणा साधला. नंदीग्राममध्ये आंदोलन कोणी केले, यावर कोणालाही माहिती घेण्याची गरज नाही. आज शेतकरी आंदोलन करीत आहेत आणि भाजपाने तातडीने हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी रॅलीत भाजपावर हल्लाबोल केला. भाजपाकडून पैशांचा वापर केला जात आहे. यामुळे काही लोक त्यांच्याकडे जात आहेत. भाजपाकडून काही लोकांना दिल्लीतून धमकावले जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला.
दरम्यान, भाजपाकडून तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम सातत्याने केले जात आहे. शुभेंदू अधिकारी याच भागातून निवडून येतात, अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली असून भाजपाला मोठी टक्कर देणार आहेत.