कोलकाता - तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 7 जागांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका घेण्यात दिरंगाई होत असल्यावरून आपली नाराजी आता व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गुरुवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे. यावरून तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? असा प्रश्न सुखेंदू यांनी विचारला आहे.
सुखेंदू शेखर रे यांनी देशातील कोरोनाचा संसर्ग हा सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी अनुकूल आहे. राज्यातील पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसंच उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अशा एकूण सात जागांवर पोटनिवडणूक होणं अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता.
"निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"
ममता बॅनर्जी यांच्यासाठी अशा परिस्थितीत पोटनिवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोग पोटनिवडणुका घेण्यास दिरंगाई करत आहे. निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? आयोगाने लवकरात लवकर पोटनिवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सुखेंदू शेखर रे यांनी केली आहे. दिनहाटा आणि शांतीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले भाजपा नेते निशीथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांची खासदारकी कायम ठेवली आहे.
...म्हणून ममता बॅनर्जींनी पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं
मुर्शिदाबादमधील शमशेरगंज आणि जंगीपूरमधील दोन उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आणि त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मित्रा हे दोघं विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार नाहीत. मित्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ममता बॅनर्जींना मात्र विधानसभेत जाण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.