नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचं म्हणत निशाणा साधला. तसेत दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना सणसणीत टोला देखील लगावला आहे.
"भाजपाचा डीबीटी डायरेक्ट बेनिफट ट्रान्सफर, तर TMC ट्रान्सफर माय कमिशन" बनली असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला आहे. केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्स्फर बेनेफिट योजना राबविते, तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, असे सांगताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ट्रान्सफर माय कमिशन असल्याची घणाघाती टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खेला होबे (खेळ होईल) या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विकास होबे (विकास होईल) असे उत्तर दिले.
ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींकडून ‘विकास होबे’ उत्तर
दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत तृणमूल हाफ झाली, आता साफ होईल, अशीही तोफ डागली. प. बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पुरूलियात मोदींनी गुरूवारी सकाळी घेतली आणि दुपारी आसाममध्ये करीमगंज येथे सभा घेतली.
"पुरुलियाचं प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याशी जुनं नातं आहे. आज पुरुलियामध्ये पाण्याचा संघर्ष ही मोठी समस्या आहे. या ठिकाणी पाणी नसल्यानं शेती, पशूपालन करण्यास ससम्या निर्माण होत आहेत. तर पिण्याच्या पाण्याच्या समस्याही वाढत आहेत. या ठिकाणच्या लोकांना स्वत:च्या भरवशावर सोडून तृणमूल काँग्रेस आपला खेळ खेळण्यात व्यस्त आहे. त्यांनी पुरुलियाच्या लोकांना भेदभाव करणारं प्रशासन दिलं आणि सर्वात मागासलेलं क्षेत्रही बनवलं," असंही ते म्हणाले.
पुरुलिया क्षेत्राची कनेक्टिव्हीटी सुधारण्याची आवश्यकता आहे. बंगालच्या प्रत्येक क्षेत्राला रेल्वे मार्गानं जोडण्याला आमचं प्राधान्य आहे. दोन मे नंतर जेव्हा भाजपचं सरकार सत्तेत येईल त्यानंतर रेल्वेच्या प्रकल्पांना गती येईल. पुरुलिया आणि आसपासच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली जाईल की या ठिकाणाहून लोकांना दुसरीकडे जावं लागणार नाही. बंगालसाठी केंद्र सरकारनं 50 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.